नाशिक,इगतपुरी- मुकणे धरणावर फिरायला गेलेले तीन युवक बुडाल्याची खळबळजनक घटना इगतपुरीत घडली आहे. यापैकी २ युवकांचा मुकणे धरणात पोहताना दुर्देवी मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.सध्या त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. ही घटना आज दुपारी घडली आहे.
बुडून मृत पावलेल्या दोघा युवकांचे आणि वाचलेल्या युवकाचे नाव अद्याप समजलेले नाही. तिघेही युवक मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील कामगार असल्याचे समोर आले आहे. ह्या घटनेची माहिती समजताच वाडीवहे पोलिसांनी जलद वेगाने बचावकार्य सुरू केले. नरेंद्राचार्य संस्थानच्या मोफत रूग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांनीही तत्परतेने ह्यावेळी बचावकार्यात भाग घेतला होता.
या घटनेची अधिक माहिती अशी की, ‘इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरण परिसरात पर्यटन करण्यासाठी १० ते १५ युवक आज गेले होते. यापैकी तिघा युवकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. यापैकी एकाला वाचवण्यात यश आले आहे. त्या युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. युवकांचा आवाज ऐकून इतरांनी याबाबत वाडीवहे पोलिसांना माहिती दिली. तातडीने पोलिसांनी बचावकार्य सुरु केले. नरेंद्राचार्य संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रूग्णमित्र निवृत्ती गुंड यांनीही यामध्ये साहाय्य केले. दोघा युवकांचा असा बुडून मृत्यू झाल्याची वार्ता कळताच त्यांच्या कुटुंबियांवर दुखाचे आकाश कोसळले आहे. धुलीवंदन सणाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे जिंदाल कंपनी परिसरात शोककळा पसरली आहे. वाडीवचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास फड आदींनी तपास सुरू केला आहे.