शनिवारी मध्यरात्री रेमडेसिवीर इंजेक्शनचा 60 हजार वायलचा साठा असल्याच्या संशयातून ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला रात्री उशीरा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड सुद्धा बीकेसी पोलीस स्थानकात पोहचले होते याच मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागेल होते.
आता यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सूचक विधान करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढवण्याचे काम केले आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी चालू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला. सरकारी कामात हस्तक्षेप करत असून यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ अस विधान गृहमंत्र्यांनी केले आहे.
ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी पोेलिसांवर दबाव टाकला तसेच यावेळी पोलिसांशी हुज्जत सुद्धा घातली होती.शासकीय कामात हस्तक्षेप करण्यात आला. त्यामुळे चौकशीत बाधा आली आहे. या गोष्टी योग्य नाहीत आणि पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही, असा इशाराही वळसे-पाटील यांनी दिला आहे.