मुंबई : अंबानी स्फोटके, सचिन वाझे प्रकरण तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेट संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन या संबंधातील दस्तावेज सुपूर्त केले होते. आता फडणवीसांच्या या भेटीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे.
राऊत म्हणाले की, दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्यांनी यायला पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असायलाच हवा आणि त्यादृष्टीने विरोधी पक्षनेते येत असतील तर त्यांचे स्वागत करायला हवं. काहीतरी कागद घेऊन आले आणि गृहसचिवांना भेटले तो कागद काही गंभीर नाही असे राऊत यांनी बोलून दाखविले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, विरोधी पक्षाच्या हातातील कागद गंभीर आहे की नाही हे सरकार ठरवणार. त्यात सरकारला अडचणीत आणेल असं काही नाही. त्याची काय दखल घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतीलं,’ असं राऊतांनी म्हटले आहे.
विरोधी पक्ष नेते जो काही बॉम्ब घेऊन आले होते तो भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वातसुद्धा नव्हती. आम्ही दिल्लीत कुठे स्फोट झाला, महाराष्ट्रात काही पडसाद उमटतात का पाहत होतो. पण तसं काही दिसलं नाही. बंगालप्रमाणे महाराष्ट्र आणि दिल्लीत ‘खेला होबे’ सुरु आहे असा टोला सुद्धा त्यांनी लगावला होता.