दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या १० दिवसांपासून त्या ICU मध्ये उपचार घेत होत्या. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कासव चित्रपटाला २०१६ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय नितळ, अस्तु देवराई यासारखे अनेक आशयघन चित्रपट त्यानं दिग्दर्शित केले आहेत.
सुमित्रा भावे गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. या आजारावर पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण सुरु असलेल्या उपपचारांना त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक, सामाजिक विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. चौकटीबाहेरचा विचार करून, चाकोरी मोडून चित्रपटाची निर्मिती करणारी दिग्दर्शिका हरपल्याची भावना भावे यांच्या निधनामुळे व्यक्त होत आहे.
सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. दहावी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, घो मला असला हवा, कासव, अस्तु असे उत्तम चित्रपट त्यांनी तयार केले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांच्या चित्रपटांचं कौतुक झालं. अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. भावे यांनी त्यांच्या चित्रपटांमधून अनेक सामाजिक प्रश्न हाताळले होते.
सुमित्रा भावे या माहेरच्या सुमित्रा उमराणी. त्या मुळच्या पुण्याच्या. आगरकर हायस्कुलमधुन त्यांनी माध्यमिक शिक्षण तर फर्ग्युसन महाविद्यालयातुन कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतुन समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. कविता लेखन, रांगोळी, चित्रकला असे छंद जोपासत त्यांनी विद्यार्थी दशेत गुरु रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. राष्ट्रसेवा दलाच्या कला विभागात नृत्यामध्ये यांचा सहभाग होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी वृत्त निवेदन ही केले. १९६५ साला पर्यत त्या टाटा इन्स्टिट्यूट मध्ये काम करत होत्या.
टाटा इन्स्टिट्यूट सोडल्यावर त्यांनी १९८५ पर्यत सोशल वर्क फिल्डमध्ये काम केले होते. त्यात दहा वर्षे पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये समाजकार्याचे अध्यापन, अनेक सामाजिक संशोधने आणि शोधनिबंध, उरुळीकांचन येथे सर्वोदय अध्ययन केंद्र हा शिक्षण प्रयोग, मुंबईच्या कास्प- प्लान या झोपडपट्टी वस्त्यामधील मुले व कुटूंबे यांच्या विकास योजना प्रकल्पाच्या प्रमुख पदाचा कार्यभार या अनुभवानानंतर त्यांनी पुण्याच्या स्त्री-वाणी या संस्थेच्या संचालक पदावरही काम केले. या दरम्यान दलित, अशिक्षित स्त्रीं यांच्या स्वप्रतिमेच्या अभ्यासाचे निकष त्यांच्या पर्यंत पोहचविण्याच्या ईर्षेतुन त्या १९८५ सालापासून चित्रपट माध्यमाकडे वळल्या. सुमित्रा भावे या काही मूळच्या चित्रपट किवा कला क्षेत्रातील नव्हत्या. त्यांचा पिंड समाजसेविकेचा. समाजसेवा करताना आलेले अनुभव, प्रसंग, त्यांच्या सर्जनशील मनाने सूक्ष्मपणे टिपले.