हिंगोली:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लावण्यात आलेल्या कडक संचार बंदीमुळे नोकरदार व शेकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.अश्यातच हिंगोली जिल्ह्यात लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे जामठी खुर्द येथील शेतकरी ओमप्रकाश भवर यांना शेती उत्पादनाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
ओम प्रकाश यांच्या एकरभर शेतातील तयार झालेली कलिंगडाची फळं बाजारपेठ बंद असल्याने शेतातच पडून आहेत. ओमप्रकाश यांनी काही व्यापार्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु बाहेरील प्रतिकूल परिस्थितीमुळे व्यापारी अगदी कवडीमोल दरात कलिंगड खरेदी करू असे म्हणत असल्याने ओमप्रकाश हे हतबल झाले आहेत.
या शेतकऱ्याने टेंपोद्वारे ग्रामीण भागात कलिंगड विकण्याचा प्रयत्न केला परंतु तेही अवघड होत आहे. जवळपास ७० हजार रुपये लागवड खर्च व मेहनत करून विक्रीच्या वेळी जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन असल्यामुळे रसाळ कलिंगड मातीमोल होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
मागील वर्षी लॉकडाऊन होता परंतु शेतकऱ्यांना भाजीपाला व फळे विक्रीसाठी एक किंवा दोन दिवसाआड वेळ दिला जायचा. परंतु या वेळच्या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने अशी कोणतीही सवलत दिली नाही .
माझे एकट्याचेच नाही तर अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जरूर करा परंतु त्यामध्ये शेतातील पिकवलेली भाजी, फळे यांच्या विक्रीसाठी शेकऱ्यांना पुरेशी सवलत देण्यात यावी ‘अशी कळकळीची विनंती शेतकरी ओमप्रकाश भवर यांनी प्रशासनाकडे केली आहे.