डोंबिवली – कोरोना संसर्गामुळे संपूर्ण राज्याला विळखा घातल्यामुळे अनेक सण उत्सव गेल्यावर्षीपासून बंद आहेत. डोंबिवलीतील गुढीपाडवा उत्सव प्रसिद्ध आहे. या उत्सवावर यंदा देखील विरजन पडले आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या गणेश मंदिराच्या नववर्ष स्वागत यात्रेला यंदा ब्रेक लागला आहे.
दरवर्षी डोंबिवलीमधील प्रसिद्ध श्री.गणेश मंदिर संस्थान यांच्या वतीने स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. पण कोरोनामुळे मागच्या वर्षी या श्रृंखलेमध्ये खंड पडला. त्यावेळी पुढच्या वर्षी नव्या उत्साहात स्वागतयात्रा आयोजित करण्यात येईल, असे सांगण्यातही आले.
पण, परिस्थिती काहीशी सुधारत असल्याचे दिसून आले आणि पुन्हा एकदा कोरोनामुळे जीवनाची घडी विस्कटल्यामुळे यंदाच्या वर्षीही डोंबिवली येथील नववर्ष स्वागत यात्रा रद्द करण्यात आली आहे.कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यात्रा रद्द केल्याचे माहिती श्री. गणेश मंदीर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी दिली आहे. स्वागत यात्रा रद्द करण्यात आली असली, तरीही मंदिरात धार्मिक कार्यक्रम अंत्यत कमी लोकांच्या उपस्थित आणि कोरोनाचे नियम पाळून केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचे सावट असले तरीही कोरोनाचे नियम पाळत पूजाविधी पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.