भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी अडचणीत आल्या आहेत. कोथरुड मतदार संघाच्या माजी भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तक्रारदार महिलेने मेधा कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यामुळे भाजप नेत्या मेधा कुलकर्णी अडचणीत आल्या आहेत.
१७ फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली होती. संतोष आणि मनिषा भोसले हे दोघे उसाचे गुऱ्हाळ चालवतात. कोथरुड येथील गणेशकुंज सोसायटी मध्ये ते गाडा लावतात. मात्र या ठिकाणी गाडा का लावतो म्हणून या सोसायटीचे रहिवासी जयेश अनिरुद्ध कुलकर्णी आणि अनिरुद्ध उद्धव कुलकर्णी यांनी आपल्याला विचारणा केली. तसेच वरील दोघांसह मेधा कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला व पत्नीला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीमुळे पत्नीला ससून रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातुन आपल्या पत्नीचा गर्भपात झाल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे.
रामबाग कॉलनीतील गणेशकुंज सोसायटी येथे उसाच्या रसाचे गुऱ्हाळ चालविणाऱ्या जोडप्याला मारहाण केल्याने गर्भपात झाल्याचा आरोप पुण्यातील महिलेने केला आहे. या संदर्भात तक्रार दाखल झाली आहे. २९ वर्षीय मनिषा भोसले आणि संतोष भोसले यांनी याबाबत तक्रार दिली आहे.