मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या १०० कोटी हप्ता वसुलीच्या आरोपासंदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) चौकशीला सामोरे जाणार आहेत. यापूर्वी देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांची सीबीआयने चौकशी केली होती.
देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व सहाय्यक एस. कुंदन यांची सीबीआयने जवळपास कसून आठ तास चौकशी करून त्यांना सोडून दिले होते. तसेच परमबीर सिंह यांच्याकडून सुद्धा सीबीयाने माहिती घेतलेली आहे. या माहितीच्याआधारे सीबीआयचे अधिकारी आज अनिल देशमुख यांना प्रश्न विचारतील. या सगळ्यावर अनिल देशमुख काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशमुख आपला जबाब नोंदवण्यासाठी सकाळी ११:०० वाजता अंधेरीतील डीआयओच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. अनिल देशमुख यांची चौकशी झाल्यानंतर सीबीआय सोमवारी प्राथमिक चौकशीचा अहवाल निष्कर्षासह उच्च न्यायालयात सादर करेल. त्यामुळे अनिल देशमुखांची चौकशी ही निर्णायक ठरणार आहे. यापूर्वी सीबीआयया चौकशीला अनिल देशमुखांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. मात्र त्यांची याचिका कोर्टाने फेटाळून लावली होती.