पुणे : माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे याची पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तळोजा कारागृहातुन सुटल्यानंतर मुंबई-पुणे हायवेवर काढण्यात आलेल्या कारच्या रॅली प्रकरणात संजय काकडे यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच या कारवाईला पुणे पोलीस आयुक्तांनी दुजोरा दिला आहे.
कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा कारागृहातून काढलेल्या मिरवणुकीप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गजा मारणेच्या मिरवणुकीत संजय काकडे यांच्या मोठया प्रमाणात गाड्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. संजय काकडे यांची वाहने गजा मारणेच्या रॅलीत होती अशी माहिती आहे.
संजय काकडे यांना आज दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. शिवाजी नगर कोर्टात हजर केल्यानंतर, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता अधिक माहिती देतील, असं सांगण्यात येत आहे. सदर प्रकरणी माहिती अशी की, खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास ३०० गाड्या होत्या.