नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर १८ वर्षांवरील नागरिकांना सुद्धा आता लस देण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला आहे. मात्र अद्याप अनेक राज्यातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतलेला नाही. तसेच महाराष्ट्रात सुद्धा या निर्णयावरून आघाडी मधील पक्षांमध्ये एकमत झालेले नाही. अशातच आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लसीकरण वेगाने व्हावं यासाठी दिल्ली सरकारने १.३४ कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. १ मे पासून दिल्लीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केलं जाईल असंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले आहे. मोफत लसीकरणाचा दिल्लीतील सामान्य जनतेला फायदा होईल असंही त्यांनी पुढे सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी लसीच्या दारावरून केंद्र सरकारवर टीका केली होती.
राज्य आणि खासगी रुग्णालयांना एकाच किंमतीत लस मिळाली पाहीजे अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली आहे. लस निर्मिती करण्य़ाऱ्या कंपन्याचा दावा आहे की, १५० रुपये फायदा होतो.मग वेगवेगळे दर का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच केंद्र सरकारने यात दखल घेत दर निश्चित केले पाहीजेत अशी सूचनाही त्यांनी केली आहे.