५ मार्च २०१९ ला मी पहिल्यांदा नाटक (घटोत्कच) वाचलं. मग पुढे नाटकाला अनुसरून इम्प्रोवायझेशन होऊ लागली. त्यानंतर तालमीला सुरुवात झाली. पात्र बरीच होती. पण अर्थात कुठलं पात्र कोणी करायचं हे ठरलं नव्हतं. आम्ही जिकडे तालीम करतो ती एक शाळा आहे. शाळेतल्या वर्गात एवढ्या मोठ्या टीमला घेऊन तालीम करणं शक्य होत नव्हतं.
आमचे मास्तर म्हणाले कि चला मैदानात सेट लावा. आम्ही मोकळ्या आकाशाखाली तालमी करू लागलो. नाटक हळूहळू उभं राहत होतं.
मास्तर म्हणतात, ‘प्रयोगाएवढी उत्तम तालीम नाही’
याच उद्देशातून आम्ही प्रॅक्टिस करायचो.शब्द उच्चार स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करायचो. अनेक महिने मेहनती घेतली आणि अखेर नाटक बसलंच..
हळूहळू प्रयोगाची तारीख जवळ येत होती. मी काय करतेय तालमीत हे कळूनही काही समजत नव्हतं. रंगीत तालीम चांगली झाली होती.
एकदाचा प्रयोगाचा दिवस आला.त्या दिवशी वेगळीच सकारात्मकता सर्वांमध्ये दिसत होती. मनात भीतीही होती पण एवढी पॉसिटीव्ह ‘vibe’ ह्या आधी कधीच आली नव्हती. प्रयोग सुरु होण्याआधी मी विंगेत शांत बसले होते. पोटात खूप मोठा गोळा. तिसरी घंटा झाली. हात जोडले गेले.पडदा उघडला आणि खेळ सुरु झाला…प्रेक्षकांचा आणि आमचा पूर्ण दोन तास !
त्या दोन तासात जे अनुभवलं ते अविस्मरणीय होत. (प्रत्येक प्रयोगात असच होत) ती ताकद,शक्ती कमाल होती… तो खेळ संपूच नये असं वाटत होतं. प्रयोग झाल्यानंतर एकदम रिक्त रिक्त वाटायला लागत. आणि हे सगळं पुन्हा पुन्हा हवंहवंसं वाटतं. तो सगळं करवून घेतो. आपण फक्त देत रहायचं…
मात्र,या सगळ्याला आता खूप मिस करतेय. गेले अनेक महिने कोरोनामुळे सगळेच भीतीच्या सावटाखाली आहेत. काल कपाट लावत होते,कपाट लावता-लावता हाताला कॉस्ट्यूम्स लागला आणि डोळ्यात पाणी आलं. तो रंगमंच..पात्रं.. संहिता.. डोळ्यासमोर अलगद तरळत होत्या.. मनामध्ये नाटक आणि डोळ्यासमोर रंगमंच्याची रोषणाई दिसत असल्यासारखं वाटतं होत..