मालेगाव। मालेगाव तालुक्यातील वीराने शिवाराच्या बोरी नदीवरील धरणात बुडून हर्षल आणि रितेश या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. सेल्फी घेताना तोल गेला आणि ते पाण्यात बुडून बुधवारी जीवाला मुकले. हर्षल व रितेशच्या आई-वडिलांच्या आर्त टाहोने उपस्थितांचे डोळे पाणावले. हर्षल नाशिकला एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत होता. तर, रितेश मालेगाव येथे बारावीत होता. या घटनेने संपूर्ण त्यांच्या पालकांसह पंचक्रोशीतील लोकांनाही मोठाच धक्का बसला आहे. हे दोघेही मालेगाव तालुक्यातील अजंग इथले रहिवासी होते.
बुधवारी निमशेवडी येथे दोघेजण मित्राच्या विवाह सोहळ्यासाठी गेले होते. विवाहानंतर तेथून जवळच असलेल्या विराणे शिवारातील बोरी नदीवरील धरणाजवळ हे दोघे भाऊ गेले. त्या वेळी धरणावर असलेल्या सुरकुंडीवरून रितेशचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडून बुडत असताना, त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात हर्षलनेही पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने दोघेही बुडाले. तेथील आजूबाजूच्या नागरिकांनी धरणाकडे धाव घेऊन दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत दोघा भावांचा मृत्यू झाला होता. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पोलिसांचे तपास कार्य सुरू झाले आहे.