कोरोनामुळे अभूतपूर्व अशी भयानक परिस्थिती सर्वत्र उद्भवली आहे. ऑक्सिजनची टंचाई, बेडचा सवाल, तुटपुंजी आरोग्य यंत्रणा अशा अनेक अडचणींवर मात करून कोरोना युद्ध सुरु आहे. अशा आणीबाणीच्या क्षणी अनेकांच्या खऱ्या दातृत्वाची कसोटी पाहायला मिळते. बऱ्याच जणांनी त्यांची चांगली परिस्थिती असतांनाही मदत करण्याच्या लढाईत किंचितही योगदान दिले तर नाहीच पण ते सध्या कुठं आहेत ? असाही सवाल विचारला जातो. मात्र कायमच सकारात्मक राहून जनसेवेला वाहून घेतलेले डॉ. मुथा दाम्पत्य हे गेल्या वर्षीच्या कोरोना महामारीच्या काळातही अविरत रुग्ण सेवा देत होते.
तसेच त्यांनी पॅरा मेडिकल स्टाफ, पोलिस, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक, पत्रकार, फ्रंट लाईन वर्कर यांना होमिओपॅथी औषधाचे १००००० डोसचे महाराष्ट्रातील विविध भागात वाटप केले. व गरजू व गरीब नागरिकांना मोफत सेवाही दिली त्यांच्या सारख्या डॉक्टर्समुळे शहरात कोरोना नियंत्रणात होता. आणि अचानक कोरोनाची पहिलीपेक्षा भयावह अशी दुसरी लाट आली. यात ऑक्सिजनची अत्यंत गरज भासू लागली समाजसेवेच्या ध्येयाने वेड्या झालेल्या या दाम्पत्याने ‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हाथही घ्यावे’ या उक्तीप्रमाणे चक्क २६ स्वयंचलित ऑक्सिजन यंत्र व १० ऑक्सिजन सिलेंडर विकत घेतले यात त्यांना सदर यंत्र घ्यायला पैसे कमी पडत असताना त्यांनी आपल्या मित्र परिवाराच्या माध्यमातून पैसा उभा करून यंत्र विकत घेतले हे यंत्र ते गरजू रुग्णांना फक्त अनामत रक्कम घेऊन नाममात्र भाड्याने उपयोगासाठी देत आहेत व ज्यांची परिस्थिती नाही अशाही रुग्णांना जमेल तेवढी अनामत रक्कम घेऊन बिना भाड्याने देत आहे.
त्यांच्याकडे राज्यातील विविध भागातून नागरिक गरजू रुग्णसाठी यंत्र व सिलेंडर घेण्यास येतात. त्यांनी गरोदर माता, कॅन्सर रुग्ण, दिव्यांग बांधव, भारतीय सैनिकांना, गरीब बांधव यांना स्वयंचलित ऑक्सिजन यंत्र ऑक्सिजन सिलेंडर मोफत उपलब्ध करून दिले त्यांच्या या अनोख्या उपक्रमाने आता पर्यंत १००० लोकांस जीवनदान दिले असून त्यांच्याकडे अजूनही महाराष्ट्रातून बुकिंग साठी कॉल सुरू असून अनेक जण प्रतीक्षेत आहेत, तसेच होमिओपॅथी औषधही पूर्ण महाराष्ट्र भर वाटप करत आहेत.
असे या मानवातील देव रुपी डॉक्टर दाम्पत्यास आमच्याकडून मानाचा मुजरा… व अशीच जनसेवा, रुग्णसेवा त्यांच्या हातून घडो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.