जळगाव : गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप केल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी थेट त्यांच्याच मतदारसंघात जामनेर व पहूर येथे सरप्राईज व्हिजीट देऊन याबाबतचा ‘रिअॅलिटी चेक’ केला. यात तेथे पुरेशा प्रमाणात रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध असल्याचे दिसून आले.
या बाबत वृत्त असे की, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. यात जामनेर तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली असतांनाच वैद्यकीय सुविधेचा बोजवरा उडालेला आहे. काही दिवसांपूर्वीच येथील कोरोना बाधीत रूग्ण हे कोविड केअर सेंटरमधून पळून घरी गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. तर, यानंतर एकाच दिवशी तब्बल १३ रूग्णांचा मृत्यू झाल्याने येथील परिस्थिती अतिशय भयावह बनल्याची स्थिती जगासमोर आली होती. तर कालच आमदार गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची कृत्रीम टंचाई निर्माण केल्याने याचा तुटवडा भासत असल्याचा आरोप केला होता.
या पार्श्वभूमिवर, शनिवारी सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जामनेर व पहूर येथे सरप्राईज व्हिजीट दिली. त्यांनी शहरातील उपजिल्हा रूग्णालय आणि दोन खासगी रूग्णालयांमधील कोविड सेवेचा आढावा घेतला. यात त्यांनी झाडाझडती घेऊन दर्जेदार रूग्णसेवा करण्याची तंबी दिली. अनेक खासगी रूग्णालयांमध्ये अव्वाच्या सव्वा पैशांची आकारणी करण्यात येत असतांनाच रूग्णांच्या जीवाशी खेळ करण्यात येत असल्याचेही दिसून आल्याने पालकमंत्र्यांनी याबाबत संबंधीतांना निर्देश दिले.
याप्रसंगी काही रूग्णांच्या आप्तांनी येथे चांगली सुविधा मिळत नसल्याचे सांगितले. यावर पालकमंत्र्यांनी संबंधीतांना तातडीने चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले की, कोविडच्या आपत्तीमध्ये घेण्याची नव्हे तर देण्याची वेळ आहे. यामुळे आपण एकमेकांना मदत करणे हीच खरी आजची गरज आहे. डॉक्टर्स व त्यांच्या सहकार्यांनी आरोग्यसेवा ही मानवी सेवा व ईश्वर सेवा असल्याचे समजून काम करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.