आज गुढीपाडवा महाराष्ट्रात सर्वत्र हा सण अगदी थाटामाटात साजरा करतात. प्रत्येकाच्या घरच्या समोर गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत करतात याच गुडीपाढवा सणाबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
गुढीपाडव्याचे महत्त्व
पौराणिक कथांनुसार, प्रतिपदेच्या तिथीला भगवान ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती केली होती. या दिवशी भगवान ब्रह्माची विधीवत पूजा केली जाते. मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरात सुख-समृध्दी नांदते.
गुढी पाडव्याची पूजा पद्धत
१. गुढी पाडव्याचं अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केलं जाते. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावे.
२. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजविलं जातं.
३. यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते. गुढीला आंब्याची पाने, नवे कपडे आणि फुलांनी सजावलं जाते.
४. नंतर लोक भगवान ब्रह्माची पूजा करतात.
५. गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूची पूजा केली जाते.
सांस्कृृतिक इतिहास
ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला. प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरु केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. काश्मिरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षयतृतीया यादिवशी ती सासरी जाते. शक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंशात व भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‘ या नाटकांमध्ये आले आहेत.
आरोग्यदृष्ट्या महत्त्व
चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते. शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.