मुंबई – राज्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये अनपेक्षित वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. त्यात अनेक गोष्टीचा तुटवडा निर्माण होत आहे. एकीकडे मुंबईत रुग्णांना बेडची कमतरता भासत आहे. रुग्ण वाढ झपाट्यांने होत आहे. त्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत. व बेड कमी पडत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना बेड मिळणं खूप कठीण झालं आहे याच संदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आढावा घेऊन पत्रकांशी संवाद साधला आहे.
महापौर म्हणाल्या, “मुंबईतील कोविड रुग्णांना योग्य बेड मिळण्यासाठी महापालिकेनं कठोर पावलं उचलली आहेत. कठोर कार्य पद्धती अमलात आणली जाणार आहे. आता प्रत्येक वार्डसाठी दोन नोडल अधिकारी असतील. हे अधिकारी दुपारी ३ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते ७ या वेळेत ते काम पाहणार आहे. त्यामुळे सायंकाळी ७ वाजेपासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत रुग्णांना बेडसाठी जी वणवण करावी लागते. योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळतं नाही. १९१६ वर कॉल करतात. मात्र, अनेकांना फोन व्यस्त सांगतो, त्यामुळे मुंबईकरांनी प्रत्येक वॉर्डमधील वॉररुममध्येच फोन करावा. जेणेकरून वॉररुम आणि नोडल अधिकारी बेड मिळवून देण्यासाठी मदत करतील,” असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
कोरोना रुग्णांचा रिपोर्ट २४ तासांत देण्याचे आदेश पालिकेने लॅबला दिले आहेत. २४ तासांत रिपोर्ट मिळाल्यास लवकर उपचार करणं शक्य होईल आणि योग्य ठिकाणी वर्गवारी करून रुग्णांना रुग्णालयात दाखल करणं शक्य होईल. लक्षणे नसलेले रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होत आहे. त्यामुळे या रुग्णांना राहण्यासाठी हॉटेल्स ताब्यात घेण्यात येत आहेत. या हॉटेलमध्ये कोविड सेंटरसारखीच सुविधा असणार आहे. मात्र, त्यासाठी पैसे भरावे लागणार असून रुग्णांना हॉटेल निवडण्याची परवानगी देण्यात येईल, असंही त्यांनी स्प्ष्ट केलं.
प्रत्येकाने गुढीपाडवा घरीच साजरा करावा. बाबासाहेबांची जयंतीही घरीच साजरी करा. बाबासाहेबांनी केलेली देशसेवा स्मरून आपणही घरी राहून देशसेवा करू, तेच खर अभिवादन ठरेल, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.