अनिल देशमुख गृहमंत्रीपदावरून राजीनामा दिल्यानंतर हे पद कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवले जाणार असल्याचा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार केला आहे. एकीकडे गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीतील बड्या नावांची चर्चा असताना या शर्यतीत अचानक हसन मुश्रीफ यांची एन्ट्री झाली आहे.
न्यायालायने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर हसन मुश्रीफ तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते. त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवारांचा दावा कितपत खरा ठरणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शरद पवारांचे खंदे समर्थक एवढीच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ओळख नाही, तर कोल्हापूर आणि कागलच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. सलग पाचव्यांदा निवडून येऊन ते कागलकरांच्या मनातील हिंदकेसरीही ठरले आहेत.
हसन मुश्रीफ यांनी अर्थशास्त्रातून बीएची पदवी घेतली आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्त्व आहे. त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. विद्यार्थीदशेपासूनच ते चळवळीत सक्रिय होते. दलित, मुस्लिम, शोषितांच्या विकासासाठी त्यांनी नेहमी आंदोलने केली.