सोलापूर- विविध कारणांनी यापूर्वीच उजनीतील मासेमारी धोक्यात आली असताना, मांगूर जातीच्या माशानंतर आता आणखी एका नवीन प्रकारच्या उपद्रवी, घातक व विद्रूप सकर अर्थात हेलिकॉप्टर माशाची यामध्ये भर पडली आहे. हा मासा मोठ्या प्रमाणात उजनी जलाशयात सापडू लागल्याने इतर माशांच्या प्रजाती धोक्यात तर आल्या आहेतच शिवाय मच्छिमारांच्या जाळ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागल्याने मच्छिमारही हैराण झाले आहेत.
सकर माशाचे उगमस्थान तसे अमेरिकेतले आहे. कालांतराने मुबंई खाडीत व वाराणसीच्या गंगा नदीत हा मासा आढळून आला होता. तेव्हापासूनच मत्स्य अभ्यासकांनी धोक्याची सूचना दिली होती. मात्र या धोकादायक माशाने आता राज्यातील सर्वांत मोठे असणाऱ्या उजनी पाणलोट क्षेत्र व्यापून टाकले आहे. मुळात तर या माशाची ओळख फिश टॅंकमधील शोभिवंत मासा म्हणून होती. मात्र फिश टॅंकमध्ये अनेक शोभिवंत माशांनी प्रवेश केल्यानंतर व पाळणाऱ्यांची हौस फिटल्यानंतर हा मासा खाडीत व नदी सोडून देण्यास सुरूवात झाली.
या माशाची वाढ जलदगतीने तर होतेच शिवाय हा मासा मिश्राहारी असल्याने तो शेवाळ्यांबरोबर इतर माशांना व त्यांची अंडी खाण्यात तरबेज असतो. हा मासा टणक असल्याने इतर माश्यांपासून हा सकर (हेलिकॉप्टर) मासा सुरक्षित राहतो. साहजिकच त्यांच्या संख्येत जलदगतीने वाढ होते. शिवाय पाण्याच्या बाहेर आला की तो जमिनीवर सापाप्रमाणे नागमोडी चालतो. तसेच पाण्याच्या बाहेर चार ते पाच तास जिवंतही राहू शकतो. संपूर्ण अंगाला काटे असल्याने या माशाला ग्राहक मात्र मिळत नाहीत.
असा हा सकर (हेलिकॉप्टर) मासा उजनीत थोड्या संख्येने नव्हे तर मोठ्या संख्येने आढळून येऊ लागला आहे. मच्छिमारांच्या जाळ्यात हा मासा अडकल्यानंतर तो सहजासहजी जाळ्यातून निघत नाही. त्यासाठी जाळी फाडावी लागत आहे. त्यामुळे जाळ्यांचे मोठे नुकसान सध्या होताना दिसत आहे. शिवाय बाजारपेठेत या माशाला मागणी नसते. सध्या शेकडोंच्या संख्येने हा मासा उजनीत सापडू लागल्याने मच्छिमारांच्या चिंतेत भर पडली आहे. मुळात उजनीचे वाढते प्रदूषण, बेकायदेशीर व व्यावसायिक मासेमारी यामुळे उजनीतील मासेमारी धोक्यात सापडली असताना, आता या सकर माशाची भर पडली आहे. त्यामुळे मत्स्य विभागाने वेळीच धोका ओळखून सकर मासे नष्ट करण्यासाठी उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी उजनी जलाशयाच्या कोंढार चिंचोली येथे मच्छिमारांना जलाशयाच्या पाण्यामध्ये सोनेरी कासव सापडले होते. त्यानंतर केत्तूर परिसरातील जलाशयाच्या फुगवट्याच्या पाण्यात एका शेतकऱ्याला पाणमांजर दिसले होते. तर उजनी जलाशयात यापूर्वी कधीही न दिसलेला जिताडा जातीचा मासा प्रथमच सापडला होता.
सकर माशाची वैशिष्ट्ये-
सकर माशामध्ये फुफ्फुसे असतात म्हणून यांना लंग फिश (lung fish) म्हणतात. या माशामधील पर हे पंख्यासारखे असतात. कधी कधी हे मासे पाण्यातून बाहेर येऊन सुमारे फूट दीड फूट हवेत उडून हवेतील हवा फुफ्फुसामध्ये भरून घेतात. पाण्यातून बाहेर येत असल्यामुळे यांना फ्लाइंग फिश तर कधी कधी हेलिकॉप्टर मासा म्हणून ओळखतात. श्वसनासाठी कल्ले पण असतात. हा मासा कॅट फिश (cat fish) या ग्रुपमध्ये मोडतो. संपूर्ण अंगावर काटेरी खवले असतात व परांना लांब काटे असतात. जाळीत सापडल्यावर या माशांना अलग करणे कठीण काम आहे. बोरीच्या काट्यांसारखे काटे असल्यामुळे जाळीत गुंतून राहतात. एक्झोसीटस (exocetous) या वैज्ञानिक नावानेही हा मासा ओळखला जातो.
कॅट फिश गणातील सकर माशाला इंग्रजीत “सकर माऊथ कॅट फिश’ या नावाने ओळखतात. या माशाचे तोंड गोलाकार असून त्याचा कडा चिकट द्रव स्राव करणाऱ्या ग्रंथींनी भरलेले असतात. पाण्यातील शेवाळ हे या माशाचे प्रमुख खाद्य आहे. शेवाळ्यांना चिकट द्रवाच्या मदतीने चिकटून राहात खाद्य कुरतडून खातात. कॅट फिश गणातील माशांमध्ये फुफ्फुसे असल्या कारणाने हे मासे पाण्याबाहेर काही काळ श्वसनाद्वारे जिवंत राहू शकतात.