मुंबई- सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी नागरिक कोरोनाचे भय नसल्यासारखे फिरत आहेत. जमावबंदी असूनही लोक ऐकत नासल्याचे समोर येत आहे. पोलीस आपले काम व कर्तव्य चोख पार पाडत आहेत.
तसेच कोरोना आल्यापासून पोलीस डोळ्यात तेल घालून नागरिकांना जपत आहेत. मात्र नागरिक कित्येक वेळा सांगूनही ऐकत नसल्याने व उद्धटपणा करत आल्याने त्यांना नाईलाजाने काठी उचलावी लागत आहे. मात्र अफवा व पोलिसांची बदनामी करणारे लोग पोलिसांचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करतात. त्यामुळे पोलिसांची बदनामी होत असल्याचे दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलिसांना सक्त सूचना दिल्या आहेत. संचारबंदी काळात नागरिकांशी सौजन्याने वागा, कोणाला उठाबशा काढायला लावू नका , वाहनाच्या कागदपत्रांची गरज वाटल्यासच पाहणी करावी, अन्यथा कागदपत्रे तपासू नये.
पोलिसांनी कायदा हातात घेऊ नये. लाठय़ा उगारू नये. काही दिवसांपूर्वीच मरीन ड्राइव्ह येथे विनामास्क फिरणाऱयांना पोलिसांनी कोंबडा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशा घटनांचे व्हिडीओ व्हायरल होऊन पोलिसांची प्रतिमा मलीन होईल असे कोणतेही कृत्य पोलिसांनी करू नये. असे सक्त आदेश हेमंत नगराळे यांनी पोलिसांना दिले आहेत.