मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. या आरोपावरून राज्यात तसेच दिल्लीत सुद्धा गदारोळ झालेला पाहायला मिळाला होता.
त्यात शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली होती. तसेच त्यांच्यावर लागवण्यात आलेल्या आरोपावेळी ते कोरोना संसर्गावर उपचार करत असल्याचा दाखला शरद पवारांनी दिला होता. मात्र आज पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी पवारांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. या आरोपानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 23, 2021
देशमुख आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतात की, करोना संसर्गाला एक वर्षाच्या काळात आमच्या पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. नागपूरला पाच फेब्रुवारीला मी करोनाबाधित झालो. त्यानंतर ५ ते १५ फेब्रुवारी मी नागपूरच्या एलिक्झर रुग्णालयात दाखल होतो. १५ फेब्रुवारीला जेव्हा मला डिस्चार्ज मिळाला, तेव्हा होम क्वारंटाईनसाठी मी खासगी विमानाने नागपूरहून लगेच मुंबईला आलो,’ असं त्यांनी व्हिडिओत म्हंटले आहे.
होम क्वारंटाईन झाल्यानंतर मी लॉकडाऊनच्या सूचनेप्रमाणे रात्री उशिरा पार्कमध्ये प्राणायाम करण्यासाठी जात होतो. नागपूरमध्ये मी हॉस्पिटलला जाण्याच्या वेळेदरम्यान आणि मुंबईतील होम क्वारंटाईनच्या दरम्यान मी अनेकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका किंवा कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो. होम क्वारंटाईननंतर एक मार्चपासून आमचे अधिवेशन होते. मात्र क्वारंटाईन पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा २८ फेब्रुवारीला घराच्या बाहेर पडलो, असे स्पष्टीकरण देत आरोप फेटाळून लावले आहे.