तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. मी एका पायावर बंगाल जिंकेन आणि दुसऱ्या पायावर दिल्ली जिंकेन, असा अजब दावा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हुगळी जिल्ह्यातील देवानंदपूर येथे केला आहे.
तसेच भाजपच्या उमेदवार निवडीवर देखील ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या की ज्या पक्षाला स्वतःचे स्थानिक कार्यकर्ते तयार करता आले नाहीत ते बंगालमध्ये येऊन निवडणूक लढवत आहेत. तृणमूळ काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केडर फोडून भाजपने उमेदवारांची यादी तयार केली आहे. त्यांना साधा सोनार बांगला देखील बोलता येत नाही अशी टीका त्यांनी केली.
काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली होती. यासाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरले होते. मात्र, हुगली येथे बोलताना याचाच आधार घेत, आता एका पायावर पश्चिम बंगाल जिंकेन आणि पुढे नंतर दोन्ही पायांवर दिल्लीही जिंकेन, असा दावा त्यांनी केला आहे. बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका घेण्यामागे भाजपवाल्यांचे कारस्थान आहे असा आरोप देखील त्यांनी लगावला आहे.