बेळगाव | बेळगाव पोट निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना बेळगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यात काल शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सभेनंतर तेथील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. तसेच बेळगाव भागातील मराठी मते फुटू नये यासाठी भाजपच्या नेत्यांनी बेळगावात प्रचारसभा घेऊ नये, असे आवाहनही करण्यात आले होते.
त्यात देवेंद्र फडणवीस हे आज बेळगाव पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रचारासाठी बेळगावात येणार आहेत. त्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी प्रतिक्रिया दिली. जर फडणवीस हे बेळगावात प्रचाराला आले तर ते महाराष्ट्रद्रोही ठरतील अशी प्रतिक्रिया शुभम शेळके यांनी मराठी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे, पुढे देवेंद्र फडणवीस यांची घेतलेल्या भेटीचा सुद्धा शेळके यांनी दाखल दिला आहे.
काही दिवसांपूर्वी आम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हा फडणवीसांनी सीमाप्रश्नी सकारात्मक भूमिका घेतली होती. तेव्हा आताच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा महाराष्ट्रातील कोणताही नेता प्रचारासाठी येणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. पण तसे झाले तर तो नेता महाराष्ट्रद्रोही आणि मराठीद्रोही असल्याचे सिद्ध होईल, असे शुभम शेळके यांनी सांगितले.