मुंबई। राज्यात राजकरण व राजकारणातील काही नेत्यांच्या भोवताली आरोपांची साडेसाती फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावांभोवती राज्यातील राजकारण फिरताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनीच वाझेंना सेवेत घेण्यास सांगितलं होतं, असं फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला राऊत सडेतोड उत्तर दिले आहे.
माध्यमांशी बोलताना राऊतांनी देवेंद्र फडणवीस हे वकील असल्याचे म्हटले आहे.”ईडी येऊ द्या किंवा ईडीचे पिताश्री येऊद्या. बाप शब्द मी मुद्दाम वापरत नाही. जो तपास करायचा, तो करा. ईडी, सीबीआय, एनआयएची मुख्यालये मुंबईत आणायची असतील, तर आम्ही त्यांना बीकेसीमध्ये चांगल्या ठिकाणी जागा देऊ. त्यांना दिल्लीत तसंही काही काम नाहीये. एका फौजदाराला घ्यावं की, नाही घ्यावं याचा निर्णय मुख्यमंत्री घेत नाही. हे निर्णय सिस्टीम घेते.
देवेंद्र फडणवीस काहीही म्हणतात. त्यांची प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते विरोधी पक्षाचे नेते आहेत. फडणवीस उत्तम वकील आहेत. त्यांनी कायद्याचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की, वकील न्यायालयात कशी केस मांडतात. वकिलांवर काय आरोप होतात?,” असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला.
“अनिल देशमुखांचा राजीनामा हा राज्य किंवा देशासमोरील एकमेव प्रश्न नाही. राजकारणात विरोधी पक्ष आरोप करणार आम्ही त्याला उत्तर देणार, ही प्रक्रिया निरंतर चालू राहणारी आहे. कालपर्यंत विरोधी पक्षाला परमबीर सिंह यांच्यावर अजिबात विश्वास नव्हता. मात्र, आज त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे.
विरोधी पक्षाच्या मागणीनुसार सगळ्यांचेच राजीनामे घेतले, तर सरकार कसे चालवणार”, असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी प्रश्न उपस्थित करून विरोधी पक्षाला टोला लगावलाय.