तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांमध्ये मुख्य लढत होत असलेल्या विधानसभेच्या सर्व जागांसाठी मत मोजणी सुरु झालेली आहे. या निवडणुकीकडे अवघ्या साऱ्या देशाचे लक्ष लागू राहिले आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामानातून सूचक वक्तव्य केले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा व्यक्तिगत पराभव ठरेल असे विधान राऊत यांनी केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये बाजी मारल्यानंतर ममता बॅनर्जी विरोधकांची गोळाबेरीज करून दिल्लीत ठाण मांडून बसतील. तेव्हा काय परिस्थिती निर्माण होईल, यावर देशाच्या राजकारणाची आगामी वाटचाल अवलंबून असेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रविवारी जाहीर होत असलेल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक या सदरात भाष्य केले आहे. यामध्ये संजय राऊत यांनी अनेक राजकीय भाकिते केली आहेत.
पश्चिम बंगालच्या निकालानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ सुरु होईल, असे छातीठोकपणे सांगणारे लोक भेटतात तेव्हा आश्चर्य वाटतं. पश्चिम बंगालच्या निकालांवर महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे, असे जे सांगतात ते नक्की कोणत्या नंदनवनात वावरत आहेत? मात्र, अमित शाह पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लक्ष घालतील, असे सांगितले जाते. एकतर पैशांचा किंवा बळाचा वापर करुन आमदारांची फोडाफोडी केली जाईल. कोरोना स्थिती हाताळण्यात अपयश आले सांगून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल. देशात औषधे आणि ऑक्सिजनअभावी चिता पेटत असताना हे राजकीय खेळ कोणाला सुचतातच कसे, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.