मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना बेडची कमतरचा भासू नये म्हणून कांजुरमार्ग येथे क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीच्या जागेत जम्बो कोवीड सेंटर उभे राहणार आहे. या कोरोना केंद्रामध्ये २५०० बेड तसेच ३०० आयसीयू युनिटची सुविधा उभारली जाणार असून या कोरोना सेंटरच्या कामाचा शुभारंभ शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज करण्यात आला.
यावेळी उपस्थित असलेल्या पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. लवकरच कोविड सेंटर सुरू होत आहे हे खरे आहे, पण आपण सगळे असे काम करू की, या कोविड सेंटरमध्ये कुणालाच यायची गरज पडणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये बसतात; घराबाहेर पडत नाहीत असे विरोधक बोलतात. एकदा हे कोरोना केंद्र सुरू झाल्यावर काही दिवसांनंतर इकडे एकदा बघायला या म्हणजे मुख्यमंत्री यंत्रणा कशी राबवतात ते समजेल असे आव्हान संजय राऊत विरोधकांना दिले.
सदर कोरोना सेंटर पूर्व उपनगरातील रुग्णांसाठी क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीच्या जागेत सुरू व्हावे यासाठी आमदार सुनील राऊत यांनी पाठपुरावा केला. मुंबईत 3 महाजम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहेत त्यातील सगळय़ात मोठे म्हणजे 2500 बेड्स आणि 300 आय.सी.यु युनिट असलेले कोविड सेंटर कांजुरमार्ग येथील क्रॉम्प्टन ग्रीव्हस कंपनीच्या आवारात सुरू होत आहे. अशी माहिती आमदार सुनील राऊत यांनी दिलेली आहे.