फलटणमध्ये डिपी चोर बिनधास्त, वीज महावितरण सुस्त, शेतकरी संकटात, शिवसेना ठाकरे गट मैदानात

फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचे संतप्त सवाल


फलटण :फलटण तालुक्यात शेतीपंपाला विद्युतपुरवठा करणा-या डिपींची चोरी सातत्याने मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. तरडगाव विभागातील कुसुर गावातील दोन डिपी 20 दिवसापूर्वी अंदाजे 27 सप्टेंबर 2023 रोजी चोरीस गेले होते. त्याची एफ आय आर 13 ऑक्टोबर 2023 रोजी पोलीस स्टेशनला झाली आहे. पोलीस स्टेशनला एफ आय आर नोंदवण्यात वीज महावितरणचे अधिकारी वेदपाठक यांना उशिर का झाला ? संबंधित पोलीस स्टेशन एफ आय आर घेण्यात टाळाटाळ किंवा दिरंगाई करत होते का ? तसे असेल तर सदर बाब वीज महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी वर्गास कळवणे वेदपाठक यांची जबाबदारी नव्हती का ? डिपीचोरीचे असंख्य एफ आय आर फलटण तालुक्यात नोंद आहेत. मग डिपी चोरी का थांबत नाही ? असे एकामागोमाग एक संतप्त सवाल विचारत शेतक-यांच्या शेतपीकांची झालेली नुकसान भरपाई वीज महावितरणचे तरडगाव विभागाचे सहाय्यक अभियंता वेदपाठक यांच्या पगारातून देण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी केली आहे.

कुसुर येथील शेतक-यांनी दोन डिपी चोरीला गेली असल्याची तक्रार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) फलटण तालुका जनसंपर्क कार्यालयास भेट देऊन तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे लवकरात लवकर डिपी बसवण्याची मागणी केली होती. त्यानुसार सदर डिपी तात्काळ बसवण्यासाठी ठाकरे गटाच्यावतीने लेखी निवेदनही देण्यात आले आहे. वारंवार डिपी चोरी सातत्याने सुरु असुन डिपी चोरी रोखण्याचे व डिपी चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान अनुक्रमे वीज महावितरण व पोलीस स्टेशन यांचेवर आहे. फलटण तालुक्यातील शेतकरी मात्र यामुळे मोठ्या प्रमाणावर संकटात आला आहे. परंतू शिवसेना ठाकरे गट व फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे हे मात्र शेतक-यांचे डिपी बसवण्यासाठी सातत्याने मैदानात उतरुन शेतक-यांना मदत करताना दिसत आहेत.

फलटण तालुका वीज महावितरणचे मुख्य अभियंता ग्रामोपाध्ये साहेब यांनी मात्र तरडगाव विभागाचे सहाय्यक अभियंता वेदपाठक यांना दोन दिवसात तातडीने कुसुर याठिकाणी डिपी बसवण्यासाठीचे आदेश दिले आहेत. तरीदेखील वेदपाठक यांचेकडुन सदर कामामध्ये दिरंगाई होत आहे. याची वीज महावितरणच्या वरिष्ठ अधिका-यांनी गंभीर दखल घ्यावी व तात्काळ दोन्ही डिपी बसवण्यात यावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने शेतक-यांसह भव्य आंदोलन लोकशाही मार्गाने केले जाईल असा आक्रमक इशारा शिवसेना ठाकरे गटाचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी शिवसेना व शेतक-यांच्यावतीने दिला आहे.

फलटण वीज महावितरणचे मुख्य अभियंता ग्रामोपाध्ये यांना निवेदन देताना तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेसह उपतालुका प्रमुख दिपक डोंबाळे, विभाग प्रमुख किसन यादव व कुसुर गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *