मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. यावेळी देशभरात कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून मोदी यांना संजय राऊतांनी टोला लगावला आहे, मंदीच्या लाटेने सगळेच गटांगळ्या खातील अशी स्थिती आहे. राज्यकर्ते आत्मसंतुष्ट व आत्मप्रौढीत मग्न असले की, हे असे होणारच! अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहेच. किमान पंतप्रधान मोदी यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून प्रे. रुझवेल्टच्या भूमिकेत शिरणे महत्त्वाचे आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
कोरोना महामारीने देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. आज देशातील ६० टक्के कामगार बेकार झाले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न दोन तृतीयांशने खाली आले आहे, पण आपले राज्यकर्ते मात्र उदासीन आणि आत्मसंतुष्ट आहेत, असं सांगतानाच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करून त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे गरजेचे आहे, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
शेअर बाजार कोसळणे हे आता नवीन राहिलेले नाही. मुकेश अंबानी यांच्या घराच्या मैलभर परिसरात जिलेटिन कांड्या असलेली एक गाडी सापडली, ते कारणही शेअर बाजार कोसळून पडायला पुरेसे ठरते. इतकी आपली अर्थव्यवस्था ठिसूळ पायावर उभी आहे. पूर्वी युद्ध किंवा महायुद्धामुळे अर्थव्यवस्था कोसळत असे. आता कोरोना संकटामुळे शेअर बाजाराची रोजच पडझड सुरू झाली आहे. आपल्याच देशात नाही, तर जगभरातच एक भयानक मंदीची लाट आली आहे. भारतासारख्या देशात उत्पादनाचा वेग घटला आहे.
लोकांनी नोटाबंदीच्या काळात नोकऱ्या गमावल्याच होत्या. आता लॉकडाऊनमध्ये उरलेल्या लोकांनीही नोकऱ्या गमावल्या. पंतप्रधान मोदी हे एक राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक चांगले अर्थतज्ञ त्यांना सोडून गेले आहेत. गुजरात हा व्यापाऱयांचा प्रदेश आहे. ”हम बनिया लोग है” असे ते लोक अभिमानाने सांगतात. मोदी यांनीही ”आपण व्यापारी आहोत” असे वारंवार सांगितले, पण व्यापारीच दुकान थंडा करून बसले आहेत.
अमेरिकेत 1924-25 सालात मंदी आली. तो महायुद्धाचा काळ होता. त्यानंतर फ्लोरिडा भागातील जमिनी खरेदी करण्याची एक लाट आली. तिने असंख्य लोकांना झपाटले. प्रवासी वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढणार आणि अमेरिकेतील व बाहेरील लोकांची फ्लोरिडा भागातील समुद्राची हवा खाण्यासाठी अतोनात गर्दी होणार या कल्पनेनेच लोक वेडे झाले. मग दिसेल ती जमीन वाटेल त्या किमती देऊन खरेदी केली जाऊ लागली, पण लोक अपेक्षेप्रमाणे येत नाहीत असे नंतर दिसून आल्यामुळे अनेकांची जन्माची कमाई नंतर मातीमोल झाली. आता दिल्ली, उत्तर प्रदेशातील नोएडा, गुरगाव भागांत लोक जमिनी खरेदी करीत आहेत. महाराष्ट्रातील पुणे, कोकण, मुंबई, ठाण्यात पैसेवाले गुंतवणूक करीत आहेत. त्यांचे भवितव्य काय ते कोणीच सांगू शकत नाही असे भाष्य आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आले आहे.