गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही भर उन्हाळ्यात करोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे, एका बाधित व्यक्तींमागे ३० जणांचा शोध घेणे आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी २४ तास लसीकरण सुरू करणे, अशा शिफारसी करोना कृती दलाने राज्य सरकारला केल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन हे समशीतोष्ण कटिबंधातील देश असून, तेथे थंडीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढला आणि उन्हाळ्यात मात्र कमी झाला आला.
मात्र भारतात याउलट चित्र पाहायला मिळाल. आपल्याकडे उन्हाळ्यात संसर्गाची तीव्रता अधिक होती आणि थंडीत कमी झाली. आता राज्यातील रुग्णसंख्या वाढत असून, येत्या उन्हाळ्यातही करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या आपल्याकडे गेल्या वर्षीच्या जुलैसारखी करोनास्थिती आहे. पुढील काही दिवस काटेकोरपणे नियंत्रण केले नाही तर पुन्हा सप्टेंबर २०२० प्रमाणे स्थिती उद्भवू शकेल. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांवर जोमाने भर देणे आवश्यक असल्याचे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.
रुग्णसंख्या वाढली तरी घाबरून जाऊ नये, असा सल्ला करोना कृती दलाचे सदस्य डॉ.शशांक जोशी यांनी दिला. ‘चाचण्या वाढविल्याने रुग्णसंख्या अधिक वाढलेली दिसते. त्यामुळे दुसऱ्या लाटेबाबत साशंकता आहे असेही ते म्हणाले.