नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्ग बाधितांचा आकडा सध्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.
या पत्रामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशभरातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची तातडीने परवानगी देण्यात यावी अशी मागणीही केली आहे. तसेच सहा महत्वाचे मुद्दे मांडले असून त्यांची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली करोनाविरुद्धचा लढा सुरु असतानाच देशामध्ये करोनाची दुसरी लाट आली असल्याचे सांगताना खेद होत आहे, असे म्हटले आहे. तसेच पुढे देशामध्य सध्या सात लाख ४० हजार अॅक्टीव्ह करोना रुग्ण असल्याचंही इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलं आहे.
करोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर चार एप्रिल २०२१ रोजी पहिल्यांदाच एका दिवसात एक लाखांहून अधिक करोना रुग्ण २४ तासांमध्ये आढळून आले. ही करोनाची साथ सुरु झाल्यानंतरची सर्वात मोठी वाढ आहे, असंही करोना परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त करताना देशातील डॉक्टरांच्या या सर्वात मोठ्या संस्थेनं म्हटलं आहे.
आतापर्यंत देशामध्ये ७ कोटी ९१ लाख व्यक्तींना करोनाची लस देण्यात आली असून त्यापैकी ६ कोटी ८६ लाख व्यक्तींना पहिला डोस तर एक कोटी पाच लाख व्यक्तींना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. सध्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना करोनाची लस दिली जात आहे. मात्र ज्या वेगाने संसर्ग होत आहे ते पाहता आम्ही तुम्हाला विनंती करतो की लसीकरणाची गती वाढवली पाहिजे आणि १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची परवानगी देण्यात आली पाहिजे. अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.