कोरोनाच्या उद्रेकामुळे जगभरातील अनेक देशांच्या रोषाला चीन सामोरा जात आहे, पण कुरापती करणार नाही तो चीन कसला? पाकिस्तान आणि चीन यांच्या कुरपतीचा इतिहास जगजाहीर आहे. जगात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वाटेल ते करू शकतो हे चीन ने वेळोवेळी दाखवून दिले आहे.
अश्यातच आता चीन आता पुन्हा भारताशी वैर पत्कारले आहे. तिबेट च्या परिसरात ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधून त्यावर जगातील सर्वात मोठा ३००अब्ज किलोवॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचे धोरण चीनकडून आखण्यात येत आहे. हा प्रकल्प जगातील सगळ्यात मोठे वीज निर्मिती केंद्र म्हणून ओळखले जाण्याच्या थ्री जॉर्जेस या प्रकल्पाला मागे टाकणार आहे.
उत्तर हिमालयाच्या जवळ तिबेट मध्ये उगमस्थान असलेली ब्रह्मपुत्रा नदी ही बांगलादेश व भारतातील ईशान्य राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते.त्यामुळे तिबेट वर होणाऱ्या चीन च्या प्रकल्पाचा भारतातील ईशान्येकडील राज्यांना याचा चांगलाच फटका बसणार आहे.
याचपार्श्वभूमीवर जगभरातील पर्यावरण स्नेहींचा चीनच्या या प्रकल्पास तीव्र विरोध आहे. वीज निर्मिती करणाऱ्या या चीनच्या प्रकल्पामुळे ब्रह्मपुत्रा नदीतील जैवविविधतेस धोका असून पर्यावरणास हानी पोहोचणार आहे. तसेच तिबेट हे भूकंप प्रवण क्षेत्र असून येथे भूकंप झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते.ब्रह्मपुत्रा नदीवरील चीनचा हा प्रकल्प भारतासाठी ही मोठी चिंतेची बाब ठरत आहे.