मुंबई : सध्या राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन वरून राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता रेमडेसिवीर इंजेक्शनवरून रुग्णाची फसवणूक होत असल्याचा धक्कदायक प्रकार घडताना दिसून येत आहे. अशातच आता चेंबूरमध्ये सुद्धा अशीच फसवणुकीची घटना समोर आहे आली आहे.
चेंबूरच्या एका महिलेची रेमडेसिवीर इंजेक्शन ऐवजी गोळ्यांची भुकटी देऊन फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेमडेसिवीरची ऑनलाइन मागणी केल्यानंतर या महिलेने १८ हजार रुपये भरले मात्र, तिला पॅरासिटामॉल, क्रोसिन आदी औषधी गोळ्यांची भुकटी टाकण्यात आलेल्या कुप्या पाठविण्यात आल्या. सदर आलेले पार्सल उघडल्यानंतर महिलेच्या लक्षात आले.
सध्या संपूर्ण राज्यभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा टुटूआवडा जाणवू लागला आहे. त्यात खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला सहा रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज होती. या रुग्णाच्या नातेवाईक महिलेने सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली. महिलेने जाहिरातीतील क्रमांकावर संपर्क साधला व सहा कुप्यांची मागणी केली.
या सहा कुप्यांसाठी तिने ऑनलाइन १८ हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर महिलेच्या घरी पार्सल आले. तिने ते उघडले तेव्हा त्यात पाच कुप्या होत्या. प्रत्येक कुपीत रेमडेसिवीर नसून औषधी गोळ्यांची भुकटी होती. हे पाहून महिलेला धक्काच बसला. महिलेने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच टिळक नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली.