मुंबई – राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची अवस्था अधिक बिकट होत चालली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचे संक्रमण प्रचंड असल्याने राज्य सरकारला कठोर पावलं उचलावी लागणार आहेत. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी औषध, बेड तसेच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. याच संदर्भात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचा संक्रमण वेग प्रचंड असल्याने अवघ्या महिनाभरातच आरोग्य व्यवस्थेवर ताण येण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्य सरकार लॉकडाऊनच्या तयारीत आहे, असे सांगितले जात आहे.
त्यामुळे पुढे काय परिस्थिती निर्माण होईल, हे आताच सांगता येणार नाही, पण महाराष्ट्रातील आरोग्य सेवेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा, बेड्सची व्यवस्था आयसीयू बेड्स यांची व्यवस्था करण्यासंदर्भातील अधिकार सर्वच जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आलेले आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.