मुंबई : मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेली अटक यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. NIA ने तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक गोष्टी उघडकीस आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची अजून एक प्रतिक्रिया दिली आहे.
जेव्हा सचिन वाझेंना परत पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की, त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील. काही वरिष्ठ आणि प्रमुख नेत्यांशी बोलताना म्हणालो होतो की, या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत पाहाता आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकतील. हे बोललो, ते नेतेही सांगतील असे राऊत यांनी बोलून दाखविले होते.
तसेच कोणताही अधिकारी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवत असते. ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं, त्यावर कदाचित कुणाचं नियंत्रण राहिलं नसेल. यातून अनेक मंत्र्यांनाही धडा मिळाला असेल, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे. राज्य विरोधकांकडून होत असलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे भाष्य केले आहे.