मुंबई दि. १३ – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची बदली झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस लक्ष वेधून घेत आहे. जगाला आता गुडबाय करण्याची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विधिमंडळ अधिवेशनात भाजपकडून हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल सवाल करतानाच मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची बदली करण्यात येईल अशी घोषणा केली होती.
काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली मोटार सापडली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलं ढवळून निघालं आहे. ह्यात भाजपने मनसुख हिरेन मृत्यूनंतर सचिन वाझे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर गृहमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची विशेष शाखा १ येथे बदली करण्यात आली.
“3 मार्च २००४ रोजी सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली होती. ती केस अजूनही अनिर्णित आहे. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची १७ वर्ष होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली.” असं व्हॉट्सअॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं आहे.