जेजुरी ( पुणे ) – रंगपंचमी निम्मित वेगवेगळ्या जातीत वाटलेले रंग आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. याच धर्तीवर जेजुरी गडावर खंडोबा देवाचा रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. मुख्य भैरवनाथ मूर्तींना रंग लावून अनोखी पूजा-अभिषेक करण्यात आला. भारतीय लोककला संस्कृतीमधील लोकदेव आणि बहुजन बांधवांचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाचे वर्षातील जत्रा -यात्रा, सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
यातूनच बहुरंगी -बहुढंगी लोककला संस्कार परंपरेचे आणि सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन येथे घडत असते. याच सण उत्सवांची परंपरा म्हणून कुलदैवताची राजधानी असलेल्या जेजुरी गडावर खंडेरायाची रंगपंचमी मोठ्या श्रद्धेने साजरी करण्यात आली. प्रातःकाळची भूपाळी पूजा -अभिषेक व आरती झाल्यानंतर मुख्य भैरवनाथ मूर्तींसह स्वयंभू लिंगाला विविध रंग लावण्यात येऊन देवांची रंगपंचमी साजरी करण्यात आली. देवांना रंग लावल्यानंतर शहरामध्ये सणाच्या उत्साहाला उधाण आलं आणि रोज पिवळी होणारी जेजुरी आज वेगळं वेगळ्या रंगात बुडालेली दिसली.