पंढरपूर – निवडणुकांच्या रणधुमाळीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे कल्याणराव काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अवघ्या दोन वर्षांतच काळेंनी भाजपला रामराम ठोकला. “मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता” अशी टोलेबाजीही कल्याणरावांनी केली. कल्याणराव काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा पंढरपुरात प्रचार करणार आहे.
पवार साहेबांची ताकद कायम स्वरुपी आमच्या पाठीशी असते. इथून पुढच्या काळात कायम स्वरूपी राष्ट्रवादीचे काम करणार” असं कल्याणराव काळे पक्षप्रवेशानंतर म्हणाले.काही दिवसांपूर्वी आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करू, असे कल्याण काळे यांनी म्हटलं होतं. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुरांडे पेटले. आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले होते.