आज एक बातमी कानावर पडली आणि संपूर्ण सिनेसृष्टी शांत झाली. ती बातमी म्हणजे किशोर नांदलस्कर यांनी जगाला निरोप दिलाय. खरं तर ही बातमी समजताच संपुर्ण सिनेसृष्टी किशोर दादांच्या आठवणीने हळहळू लागली. किशोर नांदलस्कर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती मात्र त्यांनी अखेर जगाचा निरोप घेतला.
किशोर नांदलस्कर यांचा सिनेसृष्टीतील प्रवास जाणून घ्यायला गेलोच तर त्यांना अभिनयाची आवड ही त्यांच्या वडीलांमुळे त्यांच्या मनात रुजू झाली. किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव खारेपाटण तालुक्यातील शेजवली. त्यांचा जन्म मुंबईचाच. मुंबईत लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचे लहानपण गेले. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचं शालेय शिक्षण झालं. त्या काळात त्यांनी नाटकांमधून स्त्री भूमिका केल्या होत्या.
केशवराव दाते यांच्या नाटक कंपनीत तसेच अन्य काही नाटकांमधून त्यांनी काम केले होते. नांदलस्कर यांनी सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी व हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले आहे.महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांची भूमिका होती.
‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांनी नव्याने रंगभूमीवर सादर केलं. यावेळी दिलीप प्रभावळकर यांची नाटकातली ‘राजा’ची भूमिका किशोर यांनी साकारली होती. सर्वांना हवा हवासा आणि आपला माणूस वाटणारे किशोर नांदलस्कर यांनी आज अखेरचा निरोप घेतलाय.