भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सामन्या दरम्यान दुखापत झाली आहे. चौथ्या सामन्यात शेवटच्या ओव्हर्समध्ये विराट कोहली जखमी झाल्याने मैदानाबाहेर गेला होता. भारताने हा सामना आठ धावांनी जिंकला. मात्र कोहलीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान कोहलीने आपली तबेत ठीक असल्याचे सांगितले आहे.
दुसरी धाव वाचवण्याच्या नादात विराट कोहली जखमी झाला होता. यानंतर विराटने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. दरम्यान कोहलीने आपली दुखापत जास्त गंभीर नसून २० मार्चला होणाऱ्या अंतिम सामन्याआधी आपण खेळण्यासाठी तयार असू असं सांगितलं आहे.
“हे जास्त काही गंभीर नाही. उद्या संध्याकाळी खेळायचं असल्याने मी संध्याकाळपर्यंत बरं होणं अपेक्षित आहे. त्यामुळेच मैदानातून बाहेर येण्याचा योग्य निर्णय घेतला, जेणेकरुन मैदानात अजून पाच ते सहा वेळा धावण्याची गरज भासणार नाही. महत्वाचा सामना असल्याने हा निर्णय योग्य होता,” असं विराटने सांगितलं आहे.