कोल्हापूर – शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत पिक कर्ज शून्य टक्के दराने वाटपाचा देशातील पहिलाच उपक्रम राबवणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आता एक पाऊल पुढे टाकत शेतकऱ्यांचा समूह विमा उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्याच्या कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तरी लाभ देणाऱ्या या योजनेची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरू करू असं राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितला आहे.
एकेकाळी अडचणीत असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला १४७ कोटीचा नफा झाल्याचे देखील मुश्रीफ यांनी कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत सांगितले आहे. बँकेच्या संचालक मंडळाने चिकाटीने, काटकसरीने केलेला कारभार, शेतकरी, सभासद यांनी दाखवलेला विश्वास आणि कर्ज वसुली यामुळे बँकेचा नावलौकिक वाढला आहे असं देखील मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय.