लातूर दि.१९- सध्या राज्यात दुपटीने कोरोनाचा प्रसार होत आहे . त्यात मुंबई व पुणे जिल्ह्यात सध्या कोविड १९ चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. लातूर जिल्ह्याचा मुंबई आणि पुण्याशी दररोजचा संबंध असतो. जवळपास ६० खासगी ट्रॅव्हल्स दररोज लातूर-पुणे ये-जा करत असतात. यातून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक केली जाते.
या प्रवाशांपैकी कोणाला कोरोनाची लागण झालेली असेल तर त्यातून धोका होऊ नये यासाठी महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे दररोज पुण्याहून लातुरात येणाऱ्या प्रत्येक गाडीतील प्रवाशांची चौकशी केली जाणार आहे. यासाठी पथक प्रमुख म्हणून आरोग्य सहाय्यक व्ही.पी. कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा कर्मचारी त्यांना सहकार्य करणार आहेत. पीव्हीआर चौक येथे सकाळी ५ ते ८.३० या कालावधीत हा उपक्रम राबवला जाणार आहे.
प्रवाशांपैकी कोणाला सर्दी, खोकला,अंगदुखी, ताप यासारखी लक्षणे आढळल्यास पोलिसांकडून विचारणा केल्यानंतर त्यांना करोना चाचणी करण्यास सांगितले जाईल.