मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्यात शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत येणाऱ्या दिवसात कडक लॉकडाऊन करण्या संदर्भत कडक पाऊले उचलण्याचे संकेत दिले होते.
त्यात कोरोना संसर्गाची ही साखळी जोपर्यंत तोडली जात नाही तोपर्यंत रुग्णवाढ रोखणे अशक्य आहे. हे लक्षात घेता कोरोनाची ‘भीती’ वाटण्यापेक्षा तो कसा जाईल, हा कोरोना संसर्ग कसा रोखायचा याची लोकांना ‘चिंता’ वाटली पाहिजे. यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले.
कोरोनाविरोधातील ही लढाई तुमची-माझी एकटय़ाची नाही तर आपली सर्वांची आहे. त्यासाठी काही प्रमाणात कठोर निर्बंध हे लावावेच लागतील असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचे सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन केले असते तर कदाचित आजची परिस्थिती ओढवली नसती, असे ते म्हणाले.