सध्या संपूर्ण देशभसरात कोरोनाने हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यभरात लसीकरण महिलेला सुरवात झालेली आहे. त्यात राज्यात १ कोटी ३७ लाखांपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण महाराष्ट्रात झालेले आहे. त्यामुळे लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीचे कौतुक केले.
यावेळी कोरोना काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी पाच हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केल्याची माहिती राज्यपालांनीयावेळी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त राजभवनावर आयोजित सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला. तेव्हा महाविकास आघाडीच्या विविध योजनांचा आढावा घेत राज्य सरकारच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे !
- गेल्या सुमारे सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाविरोधात एकजूटीने लढत आहोत. मात्र गेल्या काही दिवसांपासून करोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. माझ्या शासनाने या साथीला आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. याबरोबरच लसीकरणाचा वेगही वाढवला आहे. बावीस एप्रिलपर्यंत सुमारे एक कोटी सदतीस लाख लोकांचे लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. राज्याच्या विनंतीवरुन केंद्र शासनामार्फत हाफकिन संस्थेस नुकतीच लस उत्पादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्यात उत्पादीत होणारा ऑक्सिजन हा वैद्यकीय वापरासाठी शंभर टक्के राखीव ठेवण्याचा निर्णय माझ्या शासनाने घेतला आहे. अतिरिक्त प्राणवायुची उपलब्धता करण्यासाठी राज्य शासनाच्या पुढाकाराने रेल्वेची विशेष ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ रवाना करण्यात आली. देशातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.
- माझ्या शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत प्रतिबंधाच्या काळात आर्थिक दुर्बल घटकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देण्यासाठी पाच हजार चारशे शहात्तर कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे.
- प्रतिबंधाच्या कालावधीत गोरगरिबांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय माझ्या शासनाने घेतला आहे. राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
- महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामध्ये राज्याची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
- शेतकरी थकबाकीदार होऊ नये यासाठी तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार एकवीस पासून शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय माझ्या शासनाने घेतला आहे.
- शेतकऱ्यांना थकीत वीजबिलात सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
- ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत राज्यातील पशुपालकांच्या दारी पशुवैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी माझ्या शासनाने प्रथम टप्प्यात एकाहत्तर तालुक्यांमध्ये एकाहत्तर फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करुन त्याचे लोकार्पण केले आहे.
- मराठी भाषा भवनचे उपकेंद्र ऐरोली, नवी मुंबई येथे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- विश्वविख्यात पार्श्वगायिका श्रीमती आशाताई भोसले यांना माझ्या शासनाने नुकताच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला आहे.
- महाराष्ट्राच्या समृद्ध अशा मराठी रंगभूमीचा वारसा जपण्याच्या दृष्टीने गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगमंच कलादालन उभारणीचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे.
- राज्य शासनाव्दारे प्रदान करण्यात येत असलेल्या विविध सुविधा नागरिकांना त्यांच्या घरानजीक प्राप्त व्हाव्या या हेतूने माझ्या शासनाने सुमारे बत्तीस हजार पंच्याहत्तर ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ स्थापन केली आहेत. सेवा हमी अधिनियमांतर्गत आजपर्यंत सदतीस विभागांशी संबंधित चारशे तीन सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.