मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बृहमुंबई महानगर पालिकेला काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. या सूचनेमुळे मुंबईत कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत होणार आहे. ते मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड 19 संसर्ग परिस्थितीच्या ऑनलाईन आढावा बैठकीत बोलत होते.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. “रुग्णालयातील बेड्सचे व्यवस्थापन आणि प्राणवायू पुरवठा, औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष लक्ष द्यावे. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा परिस्थितीत लवकर कोरोनाचे निदान झाल्यास वाढत्या प्रसाराला आळा घालता येईल. त्यासाठी मुंबईतील सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांकडून रुग्णांचे चाचणी अहवाल कमी वेळेत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. असे आदेश त्यांनी दिले आहेत.