मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात युद्ध पातळीवर लसीकरणाच्या मोहिमेला सुरवात झाली आहे. मात्र आता सर्व सामान्य नागरिकांसह अनेक सेलिब्रिटींना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
त्यात आता मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. स्वत: सचिन तेंडुलकरने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असं सचिन तेंडुलकरने म्हटले आहे.
याआधी सचिनने कोरोना टेस्ट केली होती. याचा व्हिडीओ देखील सचिनने आपल्या इंस्टग्रामवर पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये तेंडुलकर डॉक्टरांसोबत मस्ती करताना दिसत होता. त्यामुळे हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. आता सचिनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून सगळ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021