मुंबई : राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठया प्रमाणात कोरोनामुळे रुग्ण दगावत आहे. आता या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आता स्मशानभूमी सुद्धा अपुरी पडत आहे. आज वाढत जात असलेली रुग्णसंख्या त्यात अंत्यविधीसाठी लागलेल्या रांगा त्यामुळे येणाऱ्या दिवसात मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होत असून या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीमध्ये मृतदेह विल्हेवाट, ऑक्सिजन लिक्विड प्लान्ट, आर्थिक पॅकेज यावर चर्चा होणार आहे.
तसेच या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये आर्थिक पॅकेजवरही चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्या कामगारवर्गाला आर्थिक पॅकेज देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे. आधी पॅकेज, मग लॉकडाऊन अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळे आज त्याबाबत काही ठरतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.