मुंबई : मुंबईत नोकरी निमित्ताने अनेक शहरी आणि ग्रामीण भागातील महिला दाखल होत असतात. मात्र मुंबईत आल्यानंतर त्यांचा राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण होत असतो. याच पार्श्वभूमीवर आता महिलांना राहण्यासाठी सुसज्ज असे वसतिगृह दक्षिण मुंबईतील ताडदेव भागात म्हाडातर्फे उभारण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत ही घोषणा केली.
मुंबईत मोठ्या प्रमाणात महिला नोकरी करण्यासाठी येत असतात, मात्र त्यांना कार्यालयाच्या जवळ राहणे शक्य होत नाही. कार्यालयापासून दूर उपनगरांमध्ये राहावे लागत असल्याने रोजच्या प्रवासामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. ही गरज ओळखून ताडदेव येथील एम.पी. मिल कम्पाउंड परिसरात महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह उभारण्यात येईल.
तसेच बांधण्यात येणारे हे सुसज्ज वसतिगृह साधारण दीड ते दोन वर्षांत उभारले जाणार असून सहा महिन्यांत त्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होणार असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.
या कामासाठी अंदाजे ३५ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. देखभाल दुरुस्तीचे काम स्वतंत्र संस्था करेल. त्यामुळे गुणवत्ता व सुविधांवर परिणाम होणार नाही, असे मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.