पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये मुख्य लढत होणार आहे. त्यात तृणमूलच्या अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिट्टी देऊन भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडून तृणमूलचे खच्चीकरण करण्यात आले.
त्यात काही दिवसांपूर्वी अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपात प्रवेश केला होता. पश्चिम बंगाल निवडणुकीत चक्रवर्ती यांना मानणाऱ्या वर्गाला आकर्षित करण्यासाठी भाजपने त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. त्यात येणाऱ्या निवडणुकीला त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र भाजपच्या अंतिम यादीत सुद्धा चक्रवर्ती यांना स्थान देण्यात आलेले नाही.
भाजपाने मंगळवारी जाहीर केलेली पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची उमेदवार यादी अखेरची मानली जात आहे. यामध्ये १३ जणांची नावं आहेत. रासबिहारी मतदारसंघातून मिथुनदा रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु तिथे निवृत्त लेफ्टनंट जनरल सुब्रत सहा यांना तिकीट देण्यात आले आहे.
मिथुन चक्रवर्ती यांनी नुकतेच आपले मतदार कार्ड मुंबईहून कोलकात्याला ट्रान्सफर केले. त्यामुळे मिथुन चक्रवर्ती रिंगणात उतरण्याची शक्यता बळावली होती. नंदिग्राममधून ममता बॅनर्जी यांना टफ फाईद देणारे नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासाठी ३० मार्चला मिथुनदा प्रचार करणार आहेत. तसेच या प्रचार फेरीत अमित शाह सुद्धा सहभागी होणार आहे.