मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही.
त्यात आता शरद पवारांचे नातू आणि कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवारांनी सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ‘ब्रीच कँडी’ हॉस्पिटलमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढण्यात आले. सर्वांनाच काळजी वाटत असली तरी साहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांना लवकर आराम मिळेल. शस्त्रक्रिया करणारे डॉ. मायदेव आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार!
शस्त्रक्रियेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांसह आम्ही पवार साहेबांची भेट घेतली. टोपे साहेबांना पाहून पवार साहेबांनी त्यांच्याकडून इतर विषयांसह राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती घेतली. हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो! असे त्यांनी म्हंटले आहे.