कल्याण डोंबिवली : सध्या कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये श्रेयवादावरून वाद होताना दिसून येत आहे. त्यात वडवली येथील रेल्वे उड्डाण पुलाचे लोकार्पण रद्द झाल्याने मनसेच्या एकमेव आमदाराने अर्थात राजू पाटील यांनी या पूलाचे लोकार्पण करुन पूल वाहतुकीसाठी खुला केला होता.
मात्र रात्री हा पूल पुन्हा बंद करून या पुलाचे काही दिवसात लोकार्पण होणार आहे, अशी घोषणा शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली होती. तसेच, कोणता तरी स्टंट करुन खोडसाळपणा करण्याचं मनसेचे कामच आहे. आयत्या बिळावर नागोबा बनण्याचे काम मनसेने केले आहे, अशी खोचक टिका शिवसेना आमदारांनी मनसे आमदारांवर केली आहे.
कल्याण डोंबिवलीत सध्या श्रेयवादावरून राजकारण चांगले तापलेले आहे. कोपर पुलानंतर आता कल्याण जवळ असलेल्या वडवली रेल्वे उड्डाणपुलावरुन शिवसेना-मनसेत जुंपली आहे. सोमवारी पुलाचे लोकार्पण रद्द झाल्याने मनसे आमदार राजू पाटील शेकडो कार्यकर्त्यांसोबत या पुलावर पोहोचले. त्यांनी या पुलाचे उद्घाटन करुन पूल वाहतूकीसाठी खुला केला.
वडवली पुलाचे लोकार्पण काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आले. त्याची माहिती सर्व आमदारांना दिली होती. असे असताना मनसेने राजकीय स्टंटबाजी करीत खोडसाळपणा केला आहे अशी माहिती आमदार भोईर यांनी दिली होती.