मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहून हाफकिनसारख्या संस्थांना लस उत्पादनाची परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यात काल पंतप्रधान कार्यालयाकडून हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे.
या मान्यतेमुळे कोरोना लसीचे उत्पादन वाढून कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मदत होणार आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता १०० टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा देण्याची मागणी राज ठाकरेंनी पत्र लिहून पंतप्रधान मोदींकडे केली होती तसेच ही मागणी आता मान्य सुद्धा करण्यात आलेली आहे.
राज ठाकरे यांनी या संदर्भात ट्विट केले आहे की, ‘१००% लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की,‘ असं राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
१००% लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की. @PMOIndia
— Raj Thackeray (@RajThackeray) April 16, 2021